मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बीकेसीवरील (BKC) दसरा मेळाव्यात (dasara melava) उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधत शिंदे गटच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचे म्हटले आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसऱ्या मेळाव्यातील टीकेला उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाबाबत भाष्य केले. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
मात्र यानंतर बीकेसी येथील मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे असताना त्यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची चिठ्ठी देण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुलगा श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांक्षवर टीका केल्याचं समजताच एकनाथ शिंदे चांगलेल भडकले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
माझ्या दीड वर्षांच्या नातवावर टीका करता, त्याला नगरसेवक म्हणून हिणवता. त्याच्याशी कसली स्पर्धा करता, हे कसले राजकारण? तो जन्माला आला आणि तुमचे दिवस फिरले हे लक्षात ठेवा. मला खूप काही सांगायचे आहे. पण ही ती वेळ नाही. योग्य वेळी सगळ्या गोष्टी उघड करेन, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
"आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी आधी संपत्तीबाबत विचारलं"
आनंद दिघेसाहेब गेल्यानंतर मी उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा ते सांत्वन करतील असं वाटलं. दिघे साहेबांनी पक्ष कसा वाढवला?, संघटना कशी वाढवली, आता ठाणे जिल्ह्यात काय करावं लागेल हे विचारतील असं वाटलं होतं. त्यावेळी आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, किती आहे आणि कोणाच्या नावावर आहे? असं उद्धव ठाकरेंनी विचारल्याचा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केला.