वाढदिवसाच्या दिवशी तेजस ठाकरेंची 'ती' इच्छा पूर्ण; बाबांनी दिले खास गिफ्ट

उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. 

Updated: Aug 8, 2020, 07:04 PM IST
वाढदिवसाच्या दिवशी तेजस ठाकरेंची 'ती' इच्छा पूर्ण; बाबांनी दिले खास गिफ्ट

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. वडिलांनी दिलेल्या एका खास भेटीमुळे तेजस ठाकरेंचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरला. तेजस ठाकरे यांना वन्यजीवनाच्या अभ्यासाची आवड आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पश्चिम घाटाच्या संरक्षित क्षेत्रात वन्यजीवनाच्या अभ्यासासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. यासाठीचा रितसर प्रस्ताव तेजस ठाकरे यांनी राज्य सरकारला पाठवला होता. अखेर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे आता तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्निल पवार आणि अमृत भोसले यांना पश्चिम घाटातील जंगलात जमिनीवरील गोगल गायींचे संशोधन करता येणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमने पालींच्या दूर्मिळ प्रजातींचा शोध लावला होता. कर्नाटकातील सकलेशपुरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मीळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या होत्या. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी २०१४ सालीच  शोधून काढल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून पालींची जनुकीय रचना आणि इतर गोष्टींचा अभ्यास सुरु होता. काही दिवसांपूर्वीच तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांच्या या संशोधनला मान्यता मिळाली होती. त्यापूर्वी तेजस ठाकरे यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला 'ग्युबर्नेटोरियन ठाकरे' असे नाव देण्यात आले होते.