17 February 2024 Weather Update: राज्यात आता थंडीची चाहूल कमी होऊ लागलीये. दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागलेत. अशातच पुण्यातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईमध्ये आजपासून उष्णता वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांना आता उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला म्हणजेच आज एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात एक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य आणि कोकणात हवामान कोरडं असण्याची शक्यता आहे.
दिल्लीत पुन्हा हवामान बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुके आणि धुक्यापासून नक्कीच दिलासा मिळू शकणार आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा ढग दाटून येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. दिल्लीसह अनेक राज्यांना पाऊस आणि गारपिटीसह जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागणार आहे.
स्कायमेट वेदरच्या रिपोर्टनुसार, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या पार्श्वभूमीवर 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयात विजा पडणयाची शक्यता आहे. याचप्रमाणे गाराही पडू शकतात. गाऱ्यांच्या प्रभावामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसंच अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाबमध्ये पाऊस आणि ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्याचप्रमाणे गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये विजांच्या कडकडाटांसह गारपीट होऊ शकते. या काळात ताशी 30 ते 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.