दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

देवेंद्र फडणवीसांचे देशप्रेम नकली असल्याची टीका करत  नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 8, 2023, 03:04 PM IST
दाऊदशी संबंधित नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल title=

नागपूर :  जेलमधून बाहेर आलेले नवाब मलिक नागपूर हिवाळी अधिवेशनात आले आणि सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाला पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालं. पण यामुळे महायुतीत (Mahayuti) नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यावर नाराजी जाहीर केली आहे. यावरुन अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातंय. पण नवाब मलिक प्रकरणी फडणवीस भूमिकेवर ठाम आहेत. मी माझी भूमिका मांडलीय, तुम्ही पुढे काय करायचं ते ठरवा असं फडणवीसांनी प्रफुल्ल पटेलांना म्हटलंय.. प्रफुल्ल पटेल हे मलिक प्रकरणी चर्चा करण्यासाठी फडणवीसांच्या भेटीला गेले होते. मलिकांनी भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे मलिकांबाबत भूमिका घ्यायला नको होती असं मत पटेलांनी मांडलं. मात्र, फडणवीसांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मलिकांना विरोध केलाय.

काँग्रेसचा फडणवीसांचा हल्लाबोल
दुसरीकडे काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.  नवाब मलिकांना दाऊदशी संबंधीत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपण किती देशप्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, त्यासंदर्भात त्यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ते पत्र ट्वीटही केले पण दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा पार्टनर खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांना कसे चालतात ? ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेलं आहे मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरा व्यक्ती देशप्रेमी आहे का ? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यानंतर चार दिवसातच हे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अजित पवार फडणविसांना कसे चालतात? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी नौटंकी चालत नाही. जनताच अशा नकली देशभक्तांना धडा शिकवेल, असंही नाना पटोले म्हणाले.

मलिक तटस्थ
नवाब मलिकांवरून राजकारण तापलं असताना नबाव मलिकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. मलिकांच्या कार्यालयाकडून ही माहिती मिळाली. एनसीपी पक्ष कार्यालय एकच आहे, कोणत्या गटाचे नाही यामुळे एनसीपी पार्टी कार्यालयात मलिक बसले होते अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.