मुंबई : Coronavirus update : चिंता वाढवणारी बातमी. मुंबईकरांनो काळजी घ्या. (Coronavirus in Mumbai) पर्यटन करुन घरी परतल्यानंतर दक्षिण मुंबईतील चार कुटुंबे कोरोना बाधित झाली आहे. मात्र, लसीकरणामुळे अनेकांना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मुंबईत तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत 629 नवे रुग्ण आढळून आले असून, 7 जणांचा मृत्यू झाला. तर गुरूवारी मुंबईत 453 नवे रुग्ण आढळले, तर 5 जणांचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला मुंबईत 5 हजार 711 रुग्ण उपचार घेत आहेत.
दक्षिण मुंबईमधील उच्चभ्रू भागात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. एका कुटुंबातील अनेक सदस्यच कोरोनाबाधित होत असल्याचे आढळून येत आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटनावरून परतलेली या परिसरातील चार कुटुंबे बाधित झाल्याचे तपासणीअंती पुढे आले आहे.
मुंबईत कोरोना नियंत्रणात होता. मात्र गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र नव्या बाधितांची संख्या नियंत्रणात असल्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर बनली होती. मात्र आता कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या हद्दीत पेडर रोड, नेपिअन्सी रोड, भुलाभाई देसाई मार्ग, अल्टा माऊंट रोड या उच्चभ्रू वस्तीसोबतच गावदेवी परिसरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे विभाग कार्यालयाने रुग्णांचे सर्वेक्षण केले. रुग्णाकडून मिळालेल्या माहितीतून धक्कादायकबाब समोर आली आहे. कोरोनामुळे लागू झालेली लॉकडाऊन, संचारबंदी, तसेच लॉकडाऊन शिथिल करताना लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे अनेक नागरिकांना कोंडल्यासारखे झाले होते. त्यामुळे बाहेर फिरण्यास जाण्याचा ट्रेंड वाढत आहे.
कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर नागरिकांना नियमांचा विसर पडू लागला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागल्याचा निष्कर्ष महापालिका अधिकाऱ्यांनी काढला आहे. कोरोना प्रतिबंध लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर नागरिक बेफिकीर झाले आहेत. आता आपल्याला कोरोनाची बाधा होणार नाही, असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे मास्क, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर नियमाचा विसर पडू लागला आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे.