मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख काहीसा कमी होतोय, असं वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची प्रकरणं कमी होण्याऐवजी पुन्हा वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रातल्या सात जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असून हा चिंता वाढवणारा आकडा आहे.
काही दिवसांतच राज्यात गणेश चतुर्थीचा सण साजरा होऊ लागला आहे, ज्याबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
सणासुदीच्या काळात पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. वाढती आकडेवारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की गेल्या काही आठवड्यांपासून सर्व जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5% पेक्षा कमी राहिला असला तरी, पुणे आणि अहमदनगरसारख्या काही जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात अनुक्रमे 6.58% आणि 5.08% असा आकडा आहे. पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये मुंबईचा समावेश आहे जिथे जास्तीत जास्त कोरोना प्रकरणं नोंदवली जात आहेत.
राज्यातील एकूण 52,025 सक्रिय प्रकरणांपैकी 90.62 टक्के प्रकरणे केवळ 10 जिल्ह्यांतील आहेत. त्यापैकी 37,897 म्हणजेच 72.84 टक्के प्रकरणे केवळ 5 जिल्ह्यांमधून नोंदवली गेली आहेत. राज्य सरकारने पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना 'चिंताजनक जिल्हे' म्हणून जाहीर केलं आहे.
या जिल्ह्यांमध्ये नवीन संसर्गाचा वाढीचा दर खूप जास्त आहे. शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरू होत असून या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मात्र उर्वरित 17 जिल्ह्यांमध्ये दुसरी लाट ओसरली आहे. त्यापैकी सात जिल्ह्यांमध्ये 10 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत तर 11 जिल्ह्यांमध्ये मध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 11 ते 100 च्या दरम्यान आहे. यातील बहुतेक जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत.