जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ

कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.  

Updated: Mar 18, 2020, 03:36 PM IST
जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ title=
संग्रहित छाया

मुंबई  : राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे. मास्क आणि सॅनिटायझर यांच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता राज्य शासनाने कठोर निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम १९८० मधील तरतुदीनुसार साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसेच संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

सध्यस्थितीत राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने जनतेस जीवनावश्यक वस्तू सहजासहजी आणि रास्तभावात उपलब्ध होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे, असे छगन भुजबळ म्हणालेत.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा असल्याचे भासवून त्याचा साठा करणे व तो चढ्या भावाने विक्री करणे अशी परिस्थिती उद्‌भवल्याचे निदर्शनास येत असल्यास जीवनावश्वक वस्तू अधिनियम, १९५५ आणि त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसचे संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, तसे आदेश त्यांनी दिले आहेत.

केंद्र शासनाच्या १३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क (२ प्लाई व ३ प्लाई सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर’ यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.