कोरोनाचे सावट : पालिकेची यंत्रणा सज्ज, ट्रॅव्हल कंपन्यांना पत्र - महापौर पेडणेकर

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरादीर घेण्याची सूचना दिल्या आहेत 

Updated: Mar 12, 2020, 11:40 AM IST
कोरोनाचे सावट : पालिकेची यंत्रणा सज्ज, ट्रॅव्हल कंपन्यांना पत्र - महापौर पेडणेकर title=

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरादीर घेण्याची सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी परदेशात जाणाऱ्या सर्व टूर रद्द करण्याची गरज आहे, त्यासाठी ट्रॅव्हल कंपन्यांना पत्रही लिहल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गरज पडली तर मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी किंवा रविवारपर्यंत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत अधिवेशन संपवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तर आयपीएलबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते. 

राज्यातल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या आता अकरावर गेली. नागपुरातील एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली. काही दिवसांपूर्वी हा नागरिक अमेरिकेतून भारतात आढळला होता. या रुग्णाल कोरोनाची लक्षणं आढळली होती. त्याची कोरोना टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. 

औरंगाबाद शहरात कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सोळा वर्षाचा मुलगा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. औरंगाबादमध्ये येथे एका बेकरीत काम करत होता. त्याला चार दिवसांपासून त्याला सर्दी खोकल्याचा त्रास होता. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि तात्काळ कोरोनासाठी तयार केलेल्या विशेष वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आलेले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.