कृष्णात पाटील, झी मिडिया, मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आयसीयू आणि व्हेंटीलेटर बेड मिळत नसल्याने मुंबईत सध्या सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. नगरसेविकेची बहिणच व्हेंटिलेटरअभावी मरण पावल्याची घटना घडली आहे. नगरसेविकेच्या बहिणीचा व्हेंटिलेटरअभावी मृत्यू होत असले तिथे सर्वसामान्यांची काय अवस्था, असाच सवाल उपस्थित होत आहे.
सायन येथे राहणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविका पुष्पा कोळी यांनी कोरोना झालेल्या बहिणीला वाचवण्यासाठी जंगजंग पछाडले, परंतु नगरसेविका असूनही त्या पालिका रुग्णालयात बहिणीसाठी व्हेंटिलेटर उपलब्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या ५८ वर्षीय बहिण निर्मला पाटील याचं रविवारी रात्री निधन झालं. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने ऑक्सीजनवर त्यांना ठेवलं होतं.
रविवारी सायंकाळी संपलेले ऑक्सीजन बदलण्यात सुमारे दीड तास गेला आणि त्यांची प्रकृती आणखी बिघडली. सेव्हन हिल्सला हलवण्यासाठी कुटुंबियांनी हालचाली केल्या,परंतु १०८ ला कॉल करुनही ऑक्सिजनयुक्त अँम्बूलन्स दीड तास आली नाही आणि अखेर रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
सध्या मुंबईत आयसीयू, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने, कोरोना रुग्ण मरण पावत असल्याच्या अनेकांच्या उदाहरणासह तक्रारी आहेत.
बेड उपलब्धेसंदर्भात पालिकेने डॅशबोर्ड तयार केला आहे. यानुसार रविवारी १७ आयसीयू आणि १२ व्हेंटिलेटर कागदोपत्री उपलब्ध होते. परंतु वास्तवात मात्र आयसीयू आणि व्हेंटिलेटर कमी पडतायत, हे महापौरही मान्य करतायेत.
देशात मुंबई महापालिकेची आरोग्य सुविधा सर्वाधिक चांगली समजली जाते, परंतु कोवीडच्या संकटात तीही तोकडी ठरु लागली आहे.