How Much Mukesh Ambani Spend On Son Anant Ambani's Wedding: आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींच्या धाकट्या लेकाच्या लग्नाची केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांनी 12 जुलै रोजी सप्तपदी घेतल्या. हा विधी 12 जुलै रोजी पार पडला असला तरी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आणि सर्व सोहळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरु झाले होते. गुजरातच्या जामनगरपासून ते इटलीपर्यंत आणि अँटेलियापासून ते वांद्रे कुर्ला संकुलातील जीओ वर्ल्डपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून राजकारण, मनोरंजन, उद्योग, खेळ, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या लग्नाला नेमका किती खर्च झाला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरच नजर टाकूयात...
गुजरातमधील जामनगरमध्ये सर्वात आधी प्री-वेडींगचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर इटली ते फ्रान्सदरम्यान समुद्रातील आलिशान क्रूझवर जून महिन्यामध्ये काही खास कार्यक्रम पार पडले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून जवळपास आठवडाभर या विवाहातील वेगवेगळे कार्यक्रम टप्प्याटप्प्यात पार पडले. अंबानींच्या लग्नामधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये जागतिक स्तरावरील गायक जस्टीन बिबर, रिहाना, दिलजीत दोसांजबरोबरच अगदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून हिंदी मनोरंजनसृष्टीपर्यंत जवळपास सर्वच मोठे सेलिब्रिटी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. मात्र या लग्नाची संपूर्ण तयारी, सेलिब्रिटींना परफॉर्मन्ससाठी दिलेलं मानधन आणि एकंदरित तयारीचा खर्च किती झाला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी तुमच्या पायाखालची जमीन सरकेल अशी आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
अनंत अंबानी आणि राधिका मार्चंड यांच्या लग्नासाठी 4 ते 5 हजार कोटी रुपये खर्च झाला आहे, असं वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हटलं आहे. आता सर्वसामान्य म्हणून आपल्याला या आकडेवारीमध्ये पहिल्या आकड्यानंतर नेमके किती शून्य येतात हेच आधी मोजावं लागेल अशी स्थिती आहे. मात्र ही एवढी अवाढव्य रक्कम अंबानींच्या संपत्तीच्या 0.05 टक्केही नाही असं सांगितल्यास तुम्हाला अधिक मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे. एनसी फायनॅन्शीएल अॅडव्हायझरी सर्व्हिसेसचे संस्थापक असलेले नितीन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य भारतीय कुटुंब कौटुंबिक कमाईच्या जितका टक्के पैसा लग्नासाठी खर्च करतात त्या तुलनेत टक्केवारीनुसार विचार केला तर अंबानींनी कमीच पैसे खर्च केले आहेत. सामान्यपणे भारतीय कुटुंब लग्नामध्ये त्यांच्या कमाईच्या 5 ते 10 टक्के रक्कम खर्च करतात, असं नितीन यांनी सांगितलं आहे. "फोर्ब्सच्या यादीनुसार, 2024 मध्ये मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 10 लाख 28 हजार 544 कोटी रुपये इतकी आहे. अंबानींनी लग्नावर 5 हजार कोटी खर्च केले असं गृहीत धरलं तरी ही आकडेवारी अंबानींच्या एकूण संपत्तीच्या 0.05 टक्के इतकीच होते," असं नितीन म्हणाल्याचं वृत्त आऊटलूकने दिलं आहे.
हाच संदर्भ देत नितीन चौधरी यांनी, "याकडे पाहिल्यावर सर्वसामान्य भारतीय कुटुंबाने लग्नांवर होणारा खर्च कमी केला पाहिजे असं म्हणाव की अंबानी त्यांनी जेवढा खर्च केला पाहिजे त्याहून अधिक पैसा खर्च करत आहेत असं म्हटलं पाहिजे?" असा प्रश्न पडत असल्याचं सांगितलं.