मुंबई : भायखळा कारागृहात महिला कैदी मंजुला शेट्येची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली होती, असं क्राईम ब्रान्चच्या तपासात उघड झालंय.
हत्येला ९० दिवस पूर्ण होण्याच्या दिवशीच क्राईम ब्रँचने आरोपपत्र दाखल केलंय. ९९० पानांचं हे आरोपपत्र आहे. १८२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यात ९७ कैद्यांचेही जबाब नोंदवण्यात आलेत.
हत्या करण्याच्या उद्देशानेच मंजुलाला मारहाण करण्यात आली, त्यामुळे आपल्या कृत्याची कल्पना पोलिसांना होती असं आरोपपत्रात म्हटलंय.
जेल अधीक्षक मनिषा पोखरकर, महिला कारागृह पोलीस बिंदू नाईकडे, वासिमा शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळणे आणि आरती शिंगणे या ६ जेल पोलिसांनी हेतू पुरस्सर मंजुलाची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणाची सुनावणी ६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलीय.