मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी, APMC त वाहनांच्या लांबच लांब रांगा

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, कांदा - बटाटा, फळ मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याने आज खरेदी करण्यासाठी गर्दी .

Updated: Apr 10, 2020, 01:56 PM IST
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी, APMC त वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, कांदा - बटाटा, फळ मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याने आज मोठ्या प्रमाणात तिन्ही मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली. खरेदीसाठी APMC मार्केटमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाशिकमध्येही गर्दी होताना दिसत आहे.  उद्यापासून बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आणि लॉकडाऊनचा नियम कोणीही पाळताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने समित्या बंद करण्याता निर्णय घेतला आहे.

 कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील उमराणे, मालेगाव, चांदवड बाजारसमिती अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालेगाव आणि चांदवडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारसमित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजारसमित्या बंद झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून उमराणे बाजारसमितीही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्यातही लॉकडाऊनचा फज्जा उडताना दिसून येत आहे. अनेकांची खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. पुण्यातील मार्केट यार्ड पाठोपाठ शहरातील मंडई देखील बंद करण्यात आली आहे. भाजी खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.