काऊंटडाऊन सुरु : दुपारी 'या' वेळेत अलिबाग, मुंबई किनाऱ्यावर 'निसर्ग' धडकणार

सध्या वादळ नेमकं पोहोचलं कुठं.... ? 

Updated: Jun 3, 2020, 03:22 PM IST
काऊंटडाऊन सुरु : दुपारी 'या' वेळेत अलिबाग, मुंबई किनाऱ्यावर 'निसर्ग' धडकणार
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : अतिशय वेगानं अलिबाग, मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या निसर्ग नामक चक्रीवादळाला क्षणाक्षणाला रौद्र स्वरुप प्राप्त झालं आहे. पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या या वादळाचं एकंदर स्वरुप पाहता रायगडसह कोकणातील बऱ्याच किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

प्रचंड वेगानं समुद्रातून पुढे सरकणारं हे वादळ बुधवारी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या सुमारास अलिबाग आणि मुंबईत धडकणार आहे. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार 'निसर्ग' अलिबागपासून, ११५ किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुंबईपासून हे वादळ साधरण १६५ किमी अंतरावर आहे. त्यामुळं वादळ आणि त्यासोबत घोंगावणारं संकट हे अगदी जवळ आल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे. 

 

वाचा : कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ

सध्या वादळाचं स्वरुप हे सिव्हियर सायक्लोनिक स्टॉर्म असल्यामुळं मोठ्या प्रमाणात अलिबाग आणि महाराष्ट्रातील काही किनाही भागांमध्ये वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा हा वेग ताशी १०० ते १२० किमीपर्यंत पोहोचू शकतो. तर, समुद्रातही यामुळं १०२ मीटर उंच लाटा उसळणार आहेत असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. 

कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, उत्तर महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्ये वादळामुळे मुसळधार पाऊस कोसळणार आहे. वादळाची तीव्रता ही फार जास्त नाही आहे. वादळ फार लवकर तयार झाल्यामुळं लवकर संपणार आहे. त्यामळं मान्सूनवर याचा परिणाम होणार नाही आहे, अशी माहिती त्यांनी दिली.