कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: मी कारसेवक असताना अनेक मित्र राममंदिराच्या मुद्द्यावरून आमची टवाळी करायचे. परंतु, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आता राममंदिर उभे राहत आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मुंबई भाजपच्यावतीने दादर येथील पक्ष कार्यालयात गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनातील आपले अनुभव सगळ्यांसमोर मांडले.
'गर्जना साहेबांची, स्वप्नपूर्ती हिंदुंची!' शिवसेनेकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी
फडणवीस यांनी म्हटले की, आज मी एक कारसेवक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित आहे. १८-१९ वर्षांचा असताना मी राम शिलापूजनचा कार्यक्रम हाती घेतला होता. कारसेवक म्हणून मीही त्यावेळी गेलो होतो. अलाहाबादवरून अयोध्येला चालत जात असताना आमच्यावर लाठीमार झाला आणि दूरवर बदायूंमध्ये जेलमध्ये टाकले तीनवेळा कारसेवा झाली. तिन्ही वेळा मी सहभागी झालो होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्यावेळी आमचे अनेक मित्र पेपरमध्ये लिहीत होते. 'मंदिर बनायेंगे, लेकीन तारीख नहीं बतायेंगे' अशाप्रकारे ते आमची टिंगल करायचे. मात्र, आज सगळ्यांच्या नाकावर टिच्चून राममंदिर उभारले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अयोध्येत भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींना दिली जाणार 'ही' खास भेट
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराची कोनशिला रचली जाईल. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. राममंदिर हा आजवर भाजपच्या प्रमुख अजेंड्यापैकी एक होता. त्यामुळे बुधवारी होऊ घातलेल्या भूमिपूजन सोहळ्याचा क्षण भाजपकडून उत्सवाप्रमाणे साजरा केला जाईल.