मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णालयात होत असणारे मृत्यू, रुग्ण आणि मृतांची झपाट्याने वाढणारी संख्या या सगळ्याचे निदर्शक असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईच्या केईएम रुग्णालयात काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे १० रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र धाडले आहे.
बापरे... राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि राज्यातील प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. १९ जूनला राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ३८२७ कोरोना रुग्ण आढळून आले. तर मृतांचा आकडा ११४ इतका होता. जून महिन्यातील आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार केल्यास या महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५२.१८ टक्के वाटा हा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई आणि एमएमआर क्षेत्राचा विचार केला असता हा वाटा७३.८५ टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर ५.२७ टक्क्यांवर गेला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि कोरोना मृत्यूसंख्या दाखविण्यात अद्यापही पारदर्शितेचा अभाव याबाबींकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना पत्र...@CMOMaharashtra pic.twitter.com/UybgDqYhvC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 20, 2020
तर जून महिन्यातील १८ दिवसांत राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येत ३७.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मुंबईत ही वाढ ३५.१६ टक्के इतकी असल्याकडे फडणवीसांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय, मुंबईतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यात लक्ष घालावे. जेणेकरून कोरोनाबाबतची पारदर्शी आकडेवारी जनतेसमोर येईल. तसेच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यात लक्ष घालून दोष दूर करावेत, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात केली आहे.