मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. यासह त्यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे. तसेच या निर्णयासह फडणवीस यांनी सर्वांना एकच 'जोर का झटका' दिला. फडणवीस यांच्या या घोषणेनंतर शिंदे यांच्या ठाण्यात एकच जल्लोषाला सुरुवात झाली आहे. (devendra fadnvis big master strock eknath shinde will be new chief minsiter of maharashtra state)
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (29 जून) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून आतापर्यंत फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. त्यामुळे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं म्हणणारे फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र राजभवनावर सत्तास्थापनाच्या दाव्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ऐनवेळेस मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
"राज्याचा विकास हे मुख्य उदिष्ट असणार आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे नेणार आहे. महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे हे आता थोड्याच वेळात संध्याकाळी राजभवनात राज्याचे 20 वे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची माहिती फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे शपथ घेणार असल्याचं म्हटलं जात होतं.