अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी मुंबई भरून दाखवली असा टोला धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लगावला आहे. पावसामुळे मुंबईच्या परिस्थितीला मुंबई महागरपालिकेतले सत्ताधारी जबाबदार आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुंबई, पुण्यासह काही भागात पावसामुळे झालेल्या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आज स्थगन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सभापतींनी स्वीकारला मात्र यावर अल्पकालीन चर्चेला परवानगी त्यांनी दिली. या चर्चेला सुरुवात करताना मुंडे यांनी मुंबईच्या परिस्थितीला जबाबदार धरत शिवसेना भाजपावर टीका केली .
मुंबई महानगर पालिकेनं पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी आणि नालेसफाईसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले मात्र मुंबईत पाणी तुंबलंच असं सांगत हा भ्रष्टाचार असून याची चौकशीची मागणी मुंडे यांनी यावेळी केली. स्मार्ट सिटी बनवताना होत असलेली मुंबईचे हाल जनता सोसते आहे असं ते म्हणाले, मुंबई महानगरपालिका मुंबईकरांसाठी काम करणार आहे का ?? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.
मुंबईची आजची अवस्था पाहता मुंबई महापालिका बरखास्त करा अशी उद्विग्न मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. तुंबलेली मुंबई, मालाड इथे संरक्षक भिंत कोसळून झालेली दुर्घटना याप्रकरणी विधानसभेत चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला सुरुवात करताना अजित पवारांनी मुंबई महापालिका आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मालाड दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही अजित पवार यांनी विधानसभेत केली.