आताची मोठी बातमी! ठाकरे गटाचा दसरा मेळावा अडचणीत?

दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्कचा निर्णय पुढील 24 तासांत होण्याची शक्यता...

मेघा कुचिक | Updated: Sep 19, 2022, 02:09 PM IST
आताची मोठी बातमी! ठाकरे गटाचा दसरा मेळावा अडचणीत?  title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आजच मुंबई महापालिका शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्यासाठी आलेल्या दोन अर्जांवर निर्णय घेण्याची शक्यताय. दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट  (Thackeray Group) आणि शिंदे गटापैकी (Shinde Group) कुणालाच परवानगी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 

शिंदे गटाला BKC मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी MMRDA कडून परवानगी देण्यात आलीय. पण, ठाकरे गटाला परवानगी MMRDA ने नाकारल्याने दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला इतर पर्यायी जागांचा आता विचार करावा लागणाराय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून अर्ज करून एक महिना होत आलं असला तरी मुंबई महापालिकेने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. 

अखेरपर्यंत हा निर्णय प्रशासन ताणून धरण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेकडून (ठाकरे गटाकडून) कोर्टात जाण्याचीही तयारी सुरु आहे. उद्या पुन्हा एकदा शिवसेना-ठाकरे गटाचे शिष्ठमंडळ शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीचा निर्णय का रखडला याचा जाब विचारण्याकरता जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसला पोहोचणार आहेत. 

एकीकडे शिंदे गटाला एमएमआरडीएनं बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याकरता परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाला अद्याप एकाही मैदानावर परवानगी मिळालेली नाही. आजवर शिवसेनेकडून पालिकेला एकूण 3 अर्ज दिलेले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानं शिवाजी पार्क मैदानाकरता पहिला अर्ज 22 ऑगस्ट ला अनिल देसाई यांनी केला होता. 

दसरा मेळाव्यावर शरद पवारांचं भाष्य
दसरा मेळाव्याच्या मैदानावरील वादात शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलंय...शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे...त्यामुळे दसरा मेळावा घ्यायची त्यांची परंपरा आहे...शिंदेंना बीकेसी मैदान दिलं असेल तर दुस-यांना विरोध करणे योग्य नाही असा सल्ला पवारांनी दिलाय..