शिंदेंची 51 फुटांची तलवार, करणार ग्रँड एन्ट्री... बीकेसी मैदानावर फिल्मी इव्हेंट

दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाचा ग्रँड प्लान, 2 ते 3 लाख कार्यकर्ते येण्याची शक्यता

Updated: Oct 4, 2022, 07:04 PM IST
शिंदेंची 51 फुटांची तलवार, करणार ग्रँड एन्ट्री... बीकेसी मैदानावर फिल्मी इव्हेंट title=

Dussehra 2022 : दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. मेळाव्याच्या निमित्तानं मुंबईची राजकीय युध्दभुमी होऊ पाहतेय. सेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक वस्त्रहरण रंगणार आहे. दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) अभूतपूर्व असं नियोजन केलंय. लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी कोट्यवधींचा खर्च केलाय. 10 हजारांहून अधिक एसटी बसेस (ST Bus), खासगी बसेस (Private Bus), गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले जात आहेत. 

 मुंबईत दसऱ्याला सुट्टी असल्याने इतर वाहनांची संख्या कमी असेल असं गृहीत धरून लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईत आणण्याचं नियोजन आहे. एवढी मोठी गर्दी आवरण्याचं आणि त्याचवेळी कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर (Mumbai Police) आहे. शिवसेनेतून फूटल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाने मेगाप्लान आखलाय. 

शिंदे गटाचा ग्रँड प्लान
दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाने ग्रँड प्लान (Grand Plan) आखला आहे. या मेळाव्यात  51 फुटी तलवारीचं (51 foot sword) पूजन होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते यात तलवारीचं शस्त्रपूजन होईल. तसंच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना 12 फूटी चांदीची तलवार भेट देण्यात येणार आहे. गर्दी लक्षात घेऊन बीकेसी मैदानात (BKC Ground) 100 एलईडी स्क्रीन (LED Screen) लावले जाणार आहेत. 

बाळासाहेबांच्या भाषणांचे व्हिडिओ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाचे जुने व्हिडिओ (Video) मंचावर दाखवल जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान हे व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. बीकेसीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिफ्टमधून स्टेजवर एन्ट्री करणार आहेत. हायड्रोलिक प्रकारची ही लिफ्ट आहे. व्यासपिठावर मेळाव्यासाठी 400 बाय 1200 फूटांचा मंचही तयार करण्यात आला आहे. 

पोलिसांची कडकोट सुरक्षा
बीकेसी मैदानावर तीन हजार मुंबई पोलिसांचा ताफा दाखल झालाय. विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बीकेसी मैदानावरील सुरक्षेचा आढावा घेतला. मेळाव्यावेळी मोबाईल न वापरण्याचे निर्देश नांगरे पाटलांनी पोलिसांना दिलेत.

कार्यकर्त्यांसाठी खाद्यपदार्थांचं वाटप
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाटी दोन ते तीन लाख येणार असल्याची शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे. या लोकांच्या खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांसाठी पाच लाख वडापाव आणि फूड पॅकेट्सची सोय करण्यात येणार आहे.