ईडीकडून अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल

अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Updated: Sep 24, 2019, 07:55 PM IST
ईडीकडून अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल title=

नवी दिल्ली : नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण ईडीनं अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असू शकतो. 

याआधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने देखील काही नेत्यांना चांगलाच दणका दिला होता. 

अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे मधुकर चव्हाण, जयंतराव आवळे, दिलीप देशमुख, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह 50 जणांच्या विरोधात एमआरए पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.. 22 ऑगस्टला न्यायालयाने पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतन पोलिसांनी ही कारवाई केली होती. पण आता ईडीने देखील या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या नेत्यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी 2005 ते 2010 या काळात साखर कारखाने, सूतगिरण्यांना हजारो कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. पण कर्ज मंजूर करताना नाबार्डच्या क्रेडिट मॉनेटरिंग अरेंजमेंटचे उल्लंघन करत सुमारे 330 कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. 

नाबार्डने मार्च 2010 च्या ऑडिट अहवालावर बोट ठेवत कर्जवाटपातील अनियमिततेवर ताशेरे ओढले होते. बँकेने 2010 मध्ये नफा दाखवला होता पण प्रत्यक्षात बँकेला तोटाच असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले होते. त्या आधारावरच सरकारने 2011मध्ये संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई केली होती.