मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लवकरच मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याचे सांगितले जाते. ते वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत वरळीचे आमदार सुनील शिंदे आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे हे वरळीतून लढणार असल्याचे निश्चित झाले.
काही दिवसांपूर्वी वरळीत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. यावेळी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंना 'पेपर फोडा', असे सांगितले. मात्र, तेव्हा आदित्य ठाकरे यांनी मौन बाळगणे पसंत केले होते. परंतु आज झालेल्या बैठकीत अखेर आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता शिवसेनेकडून याची औपचारिक घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
'शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे'
दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेची अधिक जागांची मागणी भाजपला मान्य नाही. त्यामुळे वेळ पडल्यास स्वबळावर लढण्याचे संकेत अमित शहा यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या सभेत दिले होते. त्यावेळी अमित शहा यांनी मातोश्रीवर जाणे टाळले होते. त्यामुळे युती तुटणारच, अशी चर्चा सुरु झाली होती.
शिवसेना-भाजप युतीत पितृपक्षाचा खोडा ?
परंतु, अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत येणार आहेत. त्यामुळे यावेळी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावर तोडगा निघण्याची शक्यताही राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.