मुंबई : एल्फिन्स्टन रोडच्या घटनेनंतर लष्कराच्यावतीने एल्फिन्स्टन रोड परळ, करीरोड आणि आंबिवली या तीन स्थानकांत ३१ जानेवारी २०१८ पर्यंत पादचारी पूल उभारण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. यामध्ये एल्फिन्स्टन रोडच्या पादचारी पुलाचे काम गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे.
दादर दिशेकडे ३.२४ मीटर रूंदीच्या पादचारी पूल उभारण्यात येणार असून हा ब्रिज बेली पद्धतीचा असणार आहे. त्याच्या शेजारीच मध्य रेल्वेच्या १२ मीटर रूंदीच्या मोठ्या पादचारी पुलाचे कामही सुरू आहे. तसेच परळ स्थानकात लष्कराच्यावतीने दादर दिशेकडील पादचारी पुलाला जोडण्यात येणार असून त्याचा उतार एल्फिन्स्टन पश्चिमेकडील देण्यात येणार आहे.
लष्कराच्यावतीने या जोड पादचारी पुलाची उभारणी करण्यासाठी गुरुवारपासून पाया तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परळ आणि एल्फिन्स्टन दरम्यानच्या पुलासाठी महिनाभरात चार खांब उभारले जातील, या ब्रिजची रूंदी साधारणपणे ३.२४ मीटर तर लांबी ११० मीटर इतकी असणार आहे. एल्फिन्स्टन रोड व परळला जोडणार्या अरूंद पुलाच्या शेजारीच मध्य रेल्वेने १२ मीटर रूंदीचा पुल उभारण्याचे काम सुरू केले आहे.
परळ टर्मिनसचे कामही प्रगती पथावर आहे. एल्फिन्स्टन रोड पुलाच्या सोबतच करीरोड येथे सहा मीटर रूंदीचा ब्रिज दोन कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येणार आहे. तर आंबिवली येथे ३.७४ मीटरचा ब्रिज २.७ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन रोडचा ब्रिज ३.२४ मीटरचा असणार असून या ब्रिजची किंमत ५ कोटी आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मिळून ५० लाख रूपये लष्करांना देण्यात आले आहे. आंबिवली येथे लष्कराच्या ३० तर रेल्वेच्या १० जणाच्या टीमची राहण्याची व्यवस्था रेल्वेने कल्याणच्या गेस्ट हाऊस येथे केली आहे. तर करीरोड व एल्फिन्स्टनच्या ब्रिजच्या पथकाला कुलाब्यातून रोज यावे लागणार आहे.