मीरा रोडमध्ये पोलिसांची घरात घुसून कारवाई? 'तो' Video खरा की खोटा? समोर आलं सत्य

Mira Road Viral Video : मीरा रोडमध्ये घडलेल्या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. अशातच पोलिसांच्या कारवाईचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 26, 2024, 10:57 AM IST
मीरा रोडमध्ये पोलिसांची घरात घुसून कारवाई? 'तो' Video खरा की खोटा? समोर आलं सत्य title=

Mira Road Viral Video : मीरा रोडमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान झालेल्या घटनेचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून उमटत आहेत. 22 जानेवारीला, अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मीरा रोडमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी काही कारणावरून स्थानिक लोक आणि मिरवणुकीत सहभागी लोकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तोडफोड करणाऱ्यांना अटक केली आहे. मात्र या अटकेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. पण या व्हिडीओबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मीरा रोडवरील हिंसाचारासंबधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीस काही लोकांना अटक करताना दिसत आहेत. मीरा रोड अशा हॅशटॅगसह व्हिडिओ शेअर करून, काही नेटकरी दावा करत आहेत की पोलिसांनी हिंसाचारानंतर आरोपींना अटक केली. ही कारवाई 22 जानेवारीला ज्या व्यक्तींनी रस्त्यावरील गाड्यांवर आणि नागरिकांवर हल्ला केला त्यांच्यावर करण्यात आली आहे, अशा प्रकारचे कॅप्शन लिहून व्हिडीओ शेअर केले जात आहेत. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मीरा रोडच्या घटनेनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खाकी गणवेश घातलेले काही लोक घरात घुसून लोकांना अटक करत आहेत. लाठीचार्ज करत आहेत आणि त्यांना घेऊन जात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणारे लोक ही कारवाई मीरा रोडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात केलेली कारवाई असल्याचे म्हणत आहेत. मुंबई पोलीस दंगलखोरांना बेदम मारहाण करत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

मात्र आता हा व्हिडिओ जुना असून त्याचा मीरा रोड घटनेशी काहीही संबंध नसल्याचे फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे. रिव्हर्स सर्चच्या मदतीने व्हायरल व्हिडिओचे कीफ्रेम तपासले असता हा व्हिडिओ 26 ऑगस्ट 2022 रोजी फेसबुक पोस्टमध्ये आढळला. या फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हैदराबादच्या शाह अली बांदा भागातील आहे. भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर हैदराबादमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. व्हिडिओत दिसणारे लोक राजा सिंह यांचा निषेध करत होते. 

 

भाजप आमदार राजा सिंह यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन तीव्र होत असताना, हैदराबाद पोलिसांनी 24 ऑगस्ट 2022 च्या रात्री आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि शाह अली बांदा आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या मुस्लीम तरुणांच्या घरात घुसून त्यांना ताब्यात घेतले. आता हा व्हिडीओ मीरा रोडचा असल्याचे सांगून व्हायरल केला जात आहे. व्हिडीओ नीट पाहिला तर त्यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीची नंबर प्लेट दिसत आहे. गाडीच्या नंबर प्लेटवर TS 09 असे लिहिलेले दिसते. तेलंगणा राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेट्स TS ने सुरू होतात आणि हा कोड TS 09 हैदराबादचा आहे.

दरम्यान, हैदराबादमध्ये दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ मुंबईतील असल्याचे समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा मुंबईतील मीरा रोड प्रकरणाशी काहीही संबंध नाही.