मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, ही आकडेवारी फसवी नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
पहिल्या ३६ लाख शेतकऱ्यांची जिल्हा निहाय आकडेवारी येत्या दोन तीन दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ४ लाख शेतकऱ्यांची जिल्हा निहाय आकडेवारी यायला वेळ लागेल. कुठल्याही आकडेवारीत घोळ नसल्याचंही त्यांनी सांगितले.
कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या ९० टक्के शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या कर्जमाफीनुसार दीड लाखांपर्यंतचे कर्ज ज्या शेतकऱ्यांवर आहे त्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. उर्वरित ६ टक्के शेतकऱ्यांच्या कर्जफेडीत दीड लाख रूपये राज्य सरकारचा वाटा असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.