मुंबई : राज्यातल्या पोलीस दलातील बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. याप्रकरणी माजी मुख्य सचिव सिताराम कुंटेंनी ईडीसमोर एका मोठा गौप्यस्फोट केलाय. पोलिसांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याची कुणकुण मुख्यमंत्र्यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी या बदल्या रोखून धरल्या असा जबाब सिताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलाय. (former chief secretary sitaram kunte give reaction of front ed regarding transfer of police force in maharashtra)
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या, अशी माहिती त्यांनी आपल्या जबाबात दिलीय. तसच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख बदल्यांसाठी अनधिकृत यादी द्यायचे असंही कुंटेंनी म्हंटलय.
सीताराम कुंटेंचा जबाब
परमबीर यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी याबाबत फोन केल्यामुळे बदल्या रद्द केल्या. बदल्यांबाबत तक्रारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी फोनवर सांगितलं. बदल्या न करता पूर्वस्थिती ठेवण्यास त्यांनी सांगितलं. पोलिसांच्या बदल्यांसदर्भात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख अनेकदा अनऑफिशियली लिस्ट द्यायचे आणि फायनल लिस्टमध्ये त्यातील बहुतेक नावं असायची असंही कुंटेंनी आपल्या जबाबात म्हटलंय.
"रश्मी शुक्लांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना पत्र लिहिलं. जयस्वाल यांनी या पत्राला कोणतंही उत्तर दिलं नाही", असंही कुंटेंनी सांगितलंय.
सीताराम कुंटेंच्या या जबाबामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. मात्र परमबीर सिंग यांनी आपल्या जबाबात सचिन वाझेवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललंय.
अँटीलिया स्फोटकांचा मास्टरमाईंड कोण याचं उत्तर अजून मिळालेलं नसतानाच आता पोलीस अधिका-यांच्या बदल्यांवरून धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचा सूत्रधार कोण याचाही छडा लावण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.