मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं (Maharashtra Board Exam) दिली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक नसेल असंही मंडळानं स्पष्ट केलं आहे. (maharashtra ssc and hsc exam 2022 Board Exams will be held offline)
12वी परीक्षेचं वेळापत्रक
4 मार्च ते 30 मार्च या काळात बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येतील. 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान प्रात्यक्षिक आणि श्रेणी परीक्षा घेण्यात येईल. कोरोना किंवा इतर कारणांमुळे अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दुस-या टप्प्यातील परीक्षेसाठी कोरोनामुळे परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही.
10वी परीक्षेचं वेळापत्रक
तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात येईल. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होईल. काही कारणांमुळे प्रात्यक्षित परीक्षा देता न आल्यास 5 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान परीक्षा होईल.
कोरोनामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र असेल. जिथं 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतील त्यांना जवळचं परीक्षा केंद्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ दिला जाणारं आहे.
परीक्षेसाठी वाढीव वेळ मिळणार
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटं अधिकचा वेळ मिळेल. 70 गुणांपेक्षा अधिकच्या पेपरसाठी अर्धा तास जादा मिळेल. परीक्षेचा पेपर 10.30 वाजता सुरू होईल. विद्यार्थ्यांच्या हातात 10.20 वाजता तर दुपारच्या सत्रात 2.50 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येईल.
परीक्षेसाठी झिकझॅक पद्धत
परीक्षा हॉलमध्ये जास्त जास्त 25 विद्यार्थी असतील. एक सोडून एक या पद्धतीनं विद्यार्थी बसवण्यात येतील. प्रॅक्टिकल परीक्षेसाठी त्याच शाळेचे शिक्षक परीक्षक असतील.
परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात ही पुरवणी परीक्षा होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनो आता वाट कसली बघताय, लागा अभ्यासाला, तुमची परीक्षा जवळ येतेय.