मोठी बातमी! कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

BMC Covid Centre Scam : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या खंद्या समर्थक किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 5, 2023, 02:59 PM IST
मोठी बातमी! कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल title=
(फोटो सौजन्य - PTI)

Covid Center Scam : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी (Covid Scam) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोव्हिड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप किशोरी पेडणकरांवर करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.  मुंबईतील आग्रीपाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

किरीट सोमय्यांनी केले ट्वीट

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणाचा वारंवार पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या तक्रारीनंतरच पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे म्हटलं जात आहे. किशोरी पेडणेकांविरोधात गुन्हा दाखल होताच सोमय्या यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. "कोविड घोटाळा. उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोविड कफन मध्ये ही कमाई केली. 1,500 रुपयांची बॉडी बॅग (मृतदेह बॅग) 6,700 मध्ये विकत घेतली. वेदांत इन्नोटेक प्रा.लि. कंपनी, महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल," असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

काय आहे घोटाळा?

ईडीने मुंबईतील कथित कोविड घोटाळ्यावरून काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली होती. कोविड काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. कोरोना काळात औषधांच्या खरेदी वाढीव दरात करुन बॉडी बॅगच्या खरेदीतही घोटाळा झाल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं होतं. दोन हजार रुपये किमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने सांगितले होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं होतं, असा दावा केला जात आहे. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा आक्षेप डावलून हे कंत्राट देण्यात आल्याचाही आरोपही करण्यात आला होता.

रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

शिवसेना नेते रवींद्र वायकर यांना आज आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी चौकशी साठी बोलवत आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर फाईव्ह स्टार हॉटेल उभारणी केल्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या विषयी देण्यात आली होती. त्यानंतर रवींद्र वायकर यांना आज आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी चौकशी साठी बोलवण्यात आले आहे.