भाजपप्रणित महायुतीत चौथा भिडू? मुंबईसाठी भाजपचं 'नो रिस्क' धोरण

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. राज ठाकरेंची मनसे देखील महायुतीत सामील होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागल आहे.

गणेश कवाडे | Updated: Feb 19, 2024, 10:07 PM IST
भाजपप्रणित महायुतीत चौथा भिडू? मुंबईसाठी भाजपचं 'नो रिस्क' धोरण title=

Maharashtra Politics :  भाजपचं (BJP) राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीत झालं आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) सोमवारी सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घरी पोहोचले. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांची तब्बल तासभर चर्चा झाली. या चर्चेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. मात्र दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊनच शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

मनसे महायुतीत सहभागी होणार? 
मुंबईतील 6 पैकी 6 लोकसभा जागा जिंकण्याची भाजपची रणनीती आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती झालीय. मात्र मुंबईसाठी भाजपनं 'नो रिस्क' धोरण ठरवलंय. राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत घेतल्यास मुंबई जिंकता येईल, असा भाजप नेतृत्वाचा कयास आहे. त्यादृष्टीनंच मनसेला महायुतीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय. 

मात्र भाजप आणि मनसे आताच पत्ते ओपन करायला तयार नाही. गेल्या काही दिवसांत महायुतीचे नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला साथ दिली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं बोललं जातंय...

भाजपबाबत मनसेच्या इंजिनाची दिशा नेहमीच बदलत राहिलीय. कधी मोदींचं गुणगान गायचं. तर कधी लाव रे तो व्हिडिओ कॅम्पेन राबवत, मोदींवर आगपाखड करायची, असा मनसेचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळं मनसेच्या इंजिनाचं अगला स्टेशन. महायुती असणार का, याची चर्चा सुरू झालीय.