हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी गर्दी

संपूर्ण भागात शोककळा

Updated: Aug 9, 2018, 09:14 AM IST
हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी गर्दी title=

मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर आज सकाळी १० वाजता मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज मिरारोड येथे त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत ठेवण्यात आलं आहे. सकाळी सहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव राणेंच्या घरी आणण्यात आलं. मेजर कौस्तुभ राणेंना अखरेचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं सामान्य नागरिक हळहळू जमा होत आहेत. सोमवारी 
रात्री मेजर कौस्तुभ राणे जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. या चकमकीत मेजर राणेंच्या सोबत सामील झालेल्या आणखी तीन जवानांनाही वीरमरण आलं.

सोमवारी रात्री घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांचा लढा सुरू होता. या दरम्यान मेजर राणेंसह तीन जवान शहीद झाले. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. कौस्तुभ राणे येथेच लहानाचे मोठे झाले. हॉली क्रॉस शाळेत त्यांनी शिक्षण घेतले होते. कौस्तुभ राणे यांचे वडील टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत होत्या. सध्या दोघेही निवृत्त आहेत. 

मेजर कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगाही येथेच राहायला आहेत. कौस्तुभ राणे यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.