मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार

Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. आता कोस्टल रोड थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 11, 2024, 01:23 PM IST
मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार; कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार   title=
Gap Between Coastal Road and Sea Link to Be Bridged on Southbound Arm by Next Week

Coastal Road and Sea Link Connect: मुंबईकरांचा प्रवास वेगवाग होण्यासाठी पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड (Coastal Road) प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. आता कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा व जलद होणार आहे. मुंबई महापालिका कोस्टल रोडला वांद्रे वरळी सी लिंकसोबत जोडण्यासाठी 16 किंवा 17 एप्रिल रोजी 120 मीटरपर्यंत गर्डर लाँच करण्याची शक्यता आहे. यामुळं कोस्टल रोड प्रकल्पाच्या उत्तरेकडील बाजूने वांद्रे-वरळी (Bandra- Worli Sea Link) सी लिंक जोडला जाणार आहे. 

कोस्टल रोडचे उपमुख्य अभियंता एम.एम. स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 मीटर, 44 मीटर आणि 60 मीटरचे तीन गर्डर याआधीच पुलाच्या बांधणीसाठी लाँच करण्यात आले आहेत. 12 एप्रिल रोजी न्हावा गावाच्या जेट्टीवर 120 मीटरच्या बो स्ट्रिंग पुलाची कमान बार्जमध्ये लोड करण्यात येईल. त्यानंतर वरळीच्या दिशेने ही बार्ज मार्गस्थ होईल. साधारण 15-16 तारखेपर्यंत वरळीपर्यंत पोहोचेल. त्यानंतर हवामानाच्या परिस्थितीनुसार, 16 किंवा 17 एप्रिलला हा गर्डर लाँच केला जाईल. 

कोस्टल रोडचे वरळीचे टोक आणि दक्षिणेकडील सी लिंक व उत्तरेकडील बाजूची कमान हे अंतर भरुन काढण्यासाठी आठ गर्डर लाँच करण्यात आले आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक या दरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर 850 मीटर रुंद आणि 270 मीटर रुंद असे असून पुलासाठी वापरले जाणारा धातू हा स्टील असणार आहे. 

पुलाच्या एकूण गर्डरपैकी चार गर्डर याआधीच लाँच करण्यात आले आहेत. तर, दोन गर्डर न्हावा शेवा बंदरावरती तयार असून एप्रिलमध्ये लाँच करण्यात येईल. वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी अडीच हजार टन वजनाचा देशातील सर्वाधिक वजनाचा हा गर्डर बसवण्यात येणार आहे. यामुळं 120 मीटरचे अंतर जोडले जाणार असून एका बाजूच्या दोन लेन तयार होणार आहेत, असं पालिकेने म्हटलं आहे. 

वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळं वांद्रहून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्याच्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. ही वाहने सी-लिंक ते कोस्टल रोड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून थेट दक्षिण मुंबईत येऊ शकतात.