मुंबई : घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील शितपने रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांनामुळे इमारत पडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय.
दुर्घटनाग्रस्त इमारतीत सुनील शितप याच्या मालकीची जागा होती. त्याने ही जागा रुग्णालय चालविण्यासाठी दिली होती. त्यानं विद्या खाडे नावाच्या महिला डॉक्टरला हे रुग्णालय भाड्यानं चालवायला दिलं होतं. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हे हॉस्पिटल सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वीच नुतनीकरण करताना आतले कॉलम तोडण्यात आले होते. सुनील शितपनं रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांना रहिवाशांनी विरोध दर्शवला होता. रहिवाशांनी केलेल्या विरोधाला न जुमानता शितपनं जबरदस्तीनं हे काम सुरू ठेवलं होतं. तसंच रहिवाशांना धमकावल्याचंही बोललं जातंय.
या बांधकामामुळंच इमारत कोसळल्याचा आरोप रहिवाशांनीही केलाय. तर दुसरीकडे या दुर्घटनेला जबाबदार धरून एन वॉर्डच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.