'अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपालाही धक्का'

'अजित पवार यांच्या राजीनाम्याचं कारण काय? हा प्रश्न आम्हालाही पडलाय'

Updated: Sep 28, 2019, 08:33 AM IST
'अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपालाही धक्का' title=

मुंबई : शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून अजित पवार यांचा राजीनामा मंजूरही करण्यात आलाय. यावेळी, अजित पवारांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलं नसल्याचं बागडे यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला आता महिनाही उरलेला नसताना या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. दुसरीकडे, 'अजित पवारांच्या राजीनाम्यानं भाजपालाही धक्का बसल्याचं' भाजपाचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी म्हटलंय. तसंच अजित पवारांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू आहे. त्यामुळं त्यांना भाजपात घेणार नाही, गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय.

अजित पवार यांच्या राजीनाम्याचं कारण काय? हा प्रश्न आम्हालाही पडलाय. माझा आणि अजित दादांची गेल्या महिनाभरापासून भेटही झालेली नाही, असंही गिरीश महाजन यांनी 'झी २४ तास'शी बोलताना म्हटलं. कदाचित अंतर्गत कलहामुळे अजित पवारांनी हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ईडीनं माझ्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानं अजित पवार अस्वस्थ आणि उद्विग्न झालेत. त्यातूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रात्री पत्रकार परिषदेत व्यक्त केली. लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंबात कोणताही वाद नाही. आमचं कुटुंब एक आहे आणि एक राहिल. कुटुंबप्रमुख या नात्यानं माझा शब्द अंतिम असतो, असंही पवारांनी यावेळी ठासून सांगितलं. अजित पवारांशी बोलून त्यांची भूमिका समजून घेईन आणि त्यांना जबाबदाऱ्यांचं स्मरण करून देईन, असंही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.