मुंबई : देशासह राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं वेग घेतला आहे. देशात नुकतंच १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर आता महाराष्ट्रानेही लसीकरण मोहिमेत मोठा टप्पा गाठला आहे. आज राज्यात १० कोटी लसींचा टप्पा पार केला. उत्तर प्रदेशनंतर १० कोटींचं लक्ष्य गाठणारं महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, आज महाराष्ट्राने 100 दशलक्ष कोविड लसीचा मापदंड पार केला, सर्व जिल्हा अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने हे शक्य झाले, सर्वांचे अभिनंदन.
राज्यात आज १० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यात ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३ कोटी २० लाख ७४ हजरा ५०४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे.
लसीचे सर्वाधिक डोस देण्यात मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. मुंबईत सर्वाधिक १ कोटी ४९ लाख ९२ हजार ८२५ डोस देण्यात आले आहेत. तर पुण्यात १ कोटी २२ लाक ३३ हजार, ३४० डोस दिले गेले आहेत.
राज्यासाठी आणखी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होताना दिसतेय. राज्यात आज ९८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला. १२९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७.६२ टक्के इतकं आहे. राज्यात सध्या १३ हजार ३११ सक्रिय रुग्ण आहेत.