मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेल्वे प्रशिक्षणार्थींसोबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या एका बैठकीची रेल्वे पोलीस खात्यात काम करणारी व्यक्ती हेरगिरी करत असल्याचं समोर आल्यानंतर सगळ्यांना एकच धक्का बसलाय. यांतर विरोधकांची हेरगिरी करण्यासाठी सरकारकड़ून सरकारी अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा वापर केला जातोय का? असा उपस्थित केला जातोय.
सरकारकडून विरोधी पक्षाच्या सुरु असलेल्या हेरगिरीचं दुसरं प्रकरण समोर आलंय. रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसंदर्भात दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी मनसेचे मुख्य कार्यालय राजगड येथे पक्षाच्या नेत्यांची दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रकार परिषदेत रेल्वे प्रशिक्षणार्थी असल्याचं भासवून एका रेल्वे पोलिसाने संपूर्ण पत्रकार परिषद मोबाईल फोनच्या कॅमेराने चित्रित केली. तसेच रेल्वे प्रशिक्षणार्थी आणि मनसे नेते यांच्यात सुरू असलेल्या खाजगी चर्चेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न या पोलिसाने केला. यावेळी मनसे नेते आणि प्रशिक्षणार्थींना संशय आल्याने त्याला हटकले असता ती व्यक्ती रेल्वे पोलीस असल्याचं उघड झालं.
मात्र हटकताना झालेल्या बाचाबाचीची संबंधित पोलिसाने तातडीने स्थानिक शिवाजी पार्क पोलिसांकडे तक्रार केल्यानं, त्यांनी मनसे कार्यकर्त्याना ताब्यात घेतलं. त्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याबाहेर मनसे कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसाशी बाचाबाची करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलिसांनी सध्या सोडलंय. पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केलीय.
दरम्यान मनसनेही हेरगिरी करणाऱ्या त्या पोलिसाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलीय. तसेच विरोधी पक्षांची गळचेपी करण्यासाठी राज्य सरकारची ही हेरगरी सुरु असल्याचा आरोप मनसेने केलाय. याआधी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांकडून अशापद्धतीनंच चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात झाला होता. त्याचे राजकीय पडसाद उमटले होते.