दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला कवडीचीही किंमत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत, पक्ष एकसंघ असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
अजित पवार आणि पार्थ पवार नाराज नाहीत. पार्थ नाराज आहे हे कुणी सांगितलं? आजोबांना बोलण्याचे सगळे अधिकार आहेत. कुटुंबातील वरिष्ठ बोलले तर आपण नाराज होतो का? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे. दरम्यान मंत्रालयात सुप्रिया सुळेंनी घेतलेली भेट ही कामासाठी असेल, असा अंदाजही जयंत पाटील यांनी वर्तवला आहे.
भाजपमध्ये गेलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते परत येण्यासाठी संपर्क करत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव झाला आहे ते घरवापसीसाठी संपर्क करत आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये गेलेले आणि आमदार होऊ शकले नाहीत, असे लोक संपर्कात आहेत. त्यांना पक्षात घेण्यात अडचणी नाहीत, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.