हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत प्रवेश करणार?

२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते.

Updated: Jan 23, 2020, 09:09 AM IST
हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत प्रवेश करणार?

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. यावेळी मनसेला सोडचिठ्ठी देणारे जुने शिलेदार पुन्हा पक्षात परतण्याची शक्यता आहे. यामध्ये कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र, यानंतर राज ठाकरे यांच्यावर नाराज होऊन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले. मात्र, शिवसेनेतील नेत्यांशी खटके उडाल्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत परतण्यास उत्सुक असल्याचे समजते. 

राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- आठवले

यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पुन्हा मनसेत येण्याची इच्छा राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. मात्र, राज यांनी अंतिम निर्णय दिला नव्हता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार हर्षवर्धन जाधव यांना आजच्या महाविधेशनात मनसेत प्रवेश दिला जाऊ शकतो. याशिवाय, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजनही आज मनसेत प्रवेश करू शकतात. 

थोड्याचवेळात गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मनसेच्या महाअधिवेशनाला सुरूवात होणार आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील. तसेच मनसेच्या नवीन झेंड्याचेही यावेळी अनावरण होईल. प्रमुख वक्ते आणि नेते यांची भाषणे, विविध विषयांवर पक्षाची काय भूमिका असली पाहिजे, त्याबाबतचे ठराव मांडले जातील. प्रत्येक ठराव मांडण्याची जबाबदारी एका नेत्यावर देण्यात आली आहे. त्या सूचक- अनुमोदन दिले जाईल. दुपारच्या जेवणानंतर काही वक्ते आणि नेते यांची भाषणे होतील. तिसऱ्या सत्रात राज ठाकरे यांचे भाषण होणार असून त्यात पक्षाची नवी दिशा, पक्षबांधणी, पक्षाचा नवीन झेंडा याबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करतील.