राज्यात अतिवृष्टीची शक्यता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

Updated: Sep 19, 2019, 07:40 AM IST
राज्यात अतिवृष्टीची शक्यता, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टी, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, समुद्रात किनारी ताशी ६० ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यशासनाने आज शाळांना सुटी जाहीर केली आहे.

मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत आज काही ठिकाणी तर पुणे आणि सातारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे पश्चिम मध्य दिशेला आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कनार्टक, गोवा किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, गुजरातची दक्षिण किनारपट्टी या भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून दोन्ही ठिकाणच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील होऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

काल रात्री नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्हयांत विजांच्या गडगडासह पाऊस झाला. तसेच आजही या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर सिंधुदुर्ग, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्य़ांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. तसेच या दरम्यान, समुद्र खवळलेला राहणार आहे. समुद्रावर ताशी ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी कोकणातील किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.