मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असे भाकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे हा वाद ताणला जाऊन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणीही सुरु झाली आहे.
अशातच आता गिरीश महाजन यांनी भाजपला स्वबळावल लढल्यास १६० जागांवर विजय मिळेल, असे म्हटले आहे. मात्र, तरीही महायुतीसोबत निवडणूक लढवण्यास आमचे प्राधान्य असेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती निश्चित केली आहे. त्यावेळी जागावाटप आणि इतर बोलणी झाली होती. ज्या जागांबाबत शंका आहे, त्याची चर्चाही ठरल्यानुसार पार पडेल, असे महाजन यांनी सांगितले.
यावेळी प्रसारमाध्यमांनी शिवसेनेसोबत युतीची बोलणी करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का, असा प्रश्नही महाजन यांना विचारण्यात आला. तेव्हा महाजन यांनी म्हटले की, शिवसेनेसोबत युतीची बोलणी करण्यासाठी भाजपकडून तिसरा नेता कोण, हे मी कसे सांगणार? मात्र आम्हाला २४० चा आकडा पार करायचा आहे. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
२०१४ मध्ये शिवसेना आणि भाजपने ऐनवेळी युती तोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपला सर्वाधिक १२२ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केले होते. याशिवाय, काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळवला होता.