मुंबई ट्रांस हार्बर लिंकचा उद्धाटन सोहळा पडला महागात? 1300 लोकं पडले आजारी

Mumbai Trans Harbour Link: रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 16, 2024, 08:21 AM IST
मुंबई ट्रांस हार्बर लिंकचा उद्धाटन सोहळा पडला महागात? 1300 लोकं पडले आजारी  title=

Mumbai Trans Harbour Link: शुक्रवारी मुंबई ट्रांस हार्बर लिंक (एमटीएचएल) चा उद्धाटन सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी देशातील सर्वात लांब 'एमटीएचएल' या सागरी सेतूचे उद्घाटन केलं आणि यावेळी नवी मुंबईत जाहीर सभेला संबोधित केलं. या सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. अशावेळी काही लोकांना उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि डोकेदुखीचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. 

रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे.

डॉ. देवमाणे यांनी सांगितलं की, ज्यावेळी अशा मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन होतं त्यावेळी काही लों आजारी पडण्याची शक्यता असते. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या 1-2 टक्के लोकांना डिहायड्रेशन, डोकेदुखी, मळमळ इत्यादी काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील कार्यक्रमानंतर जवळपास 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे. दोन जणांना एका दिवसासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, ज्या व्यक्तींना डिहायड्रेशनची तक्रार आहे त्यांना ओआरएस पाणी, ग्लुकोज आणि हलका आहार दिला गेला. जेणेकरून त्यांच्या तब्येतील सुधारणा होईल. मुख्य म्हणजे लोक अशा कार्यक्रमांना घाईघाईने येतात आणि पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना काही काळ डिहायड्रेशन आणि डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.

लिंकवर नो हॉल्टिंग बोर्ड लावणार?

मुंबई ट्रांस हार्बर लिंकचं उद्धाटन झाल्यानंतर अनेकांनी यावरून प्रवास केला. मात्र 2 दिवसांतच हा सेतू पर्यटन स्थळ बनत असल्याचं लक्षात आलं. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी एक्सच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुलावर नो हॉल्टिंग बोर्ड लावण्याचे आवाहन पोलिसांनी एमएमआरडीएला केलंय.

अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू
  • मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य
  • 22 किमीच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी 250 रुपये टोल
  • मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार
  • अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित
  • सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे
  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमे-यात कैद होणार
  • समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार
  • शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहणार