Ind vs Aus : वर्ल्डकपच्या (World Cup 2023 Final) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतेय. दुसरीकडे भारताच्या पराभवामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. अनेकांनी भारताच्या पराभवानंतर आपलं दुःख व्यक्त केले आहे. दुसरीकडे आता वर्ल्डकपच्या सामन्यावरुन राजकारण देखील सुरु झालं आहे. हा सामना भाजपाचा होता अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी सामन्याच्या आयोजनावरुन भाजपावर निशाणा साधला आहे.
"भारताचा पराभव झाला याचं दुःख सगळ्यांनाच आहे. देशामध्ये खिलाडूवृत्ती आहे. पण जो संघ सलग 10 सामने जिंकला तो अंतिम सामन्यात पराभूत झाला. या सारखे सामने अंतिम सामने दिल्लीत किंवा मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होतात. क्रिकेटमध्ये एका राज्याची लॉबी घुसली आहे त्याने आधी स्टेडिअमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडिअम केले. मग तिथे सामना घेऊन त्याचे सगळं श्रेय भाजपा घेण्याच्या विचारात होतं. असं शक्यता होत नाही. जगाला हा सामना भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलिया असल्याचा दाखवणअयाचा प्रयत्न झाला. पण आता हरलात ना. त्यामुळे आता लोकांच्या भावनांमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. भारतीय संघ उत्तम खेळला. भारतीय जनता पक्षाच्या दुःखात सहभागी आहे," असे संजय राऊत म्हणाले.
"मी संघावर टीका करणार नाही. पण भाजप अशा थाटात होतं की वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत. पण निकालानंतर ज्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती दुर्दैवाने त्याच्यावर पाणी पडलं. मी भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांचे निवेदन ऐकले. या सामन्यासाठी कपिल देवच्या संघाला आमंत्रित केले नाही. कपिल देव तिकडे आले असते तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीली ग्रहण लागलं असतं. याला म्हणतात राजकारण. भारत हरला याचं दुःख जरी असलं तरी पडद्यामागे ज्याप्रकारचे क्रिकेटचे राजकारण सुरु आहे त्याच्यावर देशात नक्कीच चर्चा होईल," असेही संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले कपिल देव?
एका माध्यम समुहानं क्रिकेटसंबंधी चर्चेसाठी आमंत्रित केलं असता अंतिम सामन्याच्या आमंत्रणाबाबत कपिल देव यांनी भाष्य केले. 'तुम्ही मला बोलवलं, मी आलो. त्यांनी (वर्ल्ड कपच्या आयोजकांनी) नाही बोलवलं, मी नाही गेलो. मला वाटत होतं की, 1983 वर्ल्ड कपचा संपूर्ण संघ तिथं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये असावा. पण, इतकी सारी कामं सध्या सुरुयेत, इतक्या जबाबदाऱ्या आहेत की अनेकदा लोक विसरूनच जातात,' असे कपिल देव म्हणाले.