जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दिले खराब खाद्यपदार्थ, विक्रेत्यावर एक लाखांचा दंड

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये (Janshatabdi Express)  खराब जेवण देण्यात आले. त्यानंतर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Updated: Jan 14, 2020, 07:48 PM IST
जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दिले खराब खाद्यपदार्थ, विक्रेत्यावर एक लाखांचा दंड
संग्रहित छाया

मुंबई : पुन्हा एकदा  प्रीमियम ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाची तक्रार आली आहे. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये (Janshatabdi Express)  खराब जेवण देण्यात आले. खराब अन्न खाल्याच्या तक्रारीनंतर भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) विक्रेत्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने खराब खाद्य पदार्थ दिल्याबद्दल आयआरसीटीसीकडे तक्रार केली होती. ११ जानेवारी रोजी दादर-गोवा जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये (Janshatabdi Express)  प्रवाशांना न्याहारीसाठी खराब ब्रेड देण्यात आला होता.

रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थाबाबत ही पहिली तक्रार नाही. यापूर्वी जलद धावणाऱ्या तेजस आणि जनशताब्दीसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये खराब खाद्या पदार्थ देण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी आयआरसीटीसीनेही विक्रेत्याला ताकीत देत दंड ठोठावला होता. परंतु अशा घटनांनंतर आयआरसीटीसीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. प्रिमियम ट्रेनमध्ये जास्त पैसे देऊनही प्रवाशांना चांगली सुविधा का मिळत नाही?

आयआरसीटीसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, खराब खाद्यपदार्थाच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी विक्रेत्यावर कठोर कारवाई केली. रेल्वेतील प्रवाशांना देण्यात आलेली सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने पावले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.