मुंबई : गेल्या पाच वर्षांत देशातल्या ७ विमान कंपन्या बंद झाल्या आहेत. सर्वात जुन्या जेट एअरवेजवरचं प्रश्नचिन्हं कायम आहे. गेल्या पाच वर्षात मोठमोठ्या कंपन्यांना टाळे लागले. त्यात आता जेट एअरवेज कंपनीचाही समावेश झाला आहे. दरम्यान, देशभरात कर्मचाऱ्यांची निदर्शने सुरु केली आहेत. जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे वेळ आली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. देशातल्या प्रवासी विमान वाहतूक क्षेत्राचा विकास होत असतानाच कंपन्यांना मात्र घरघर लागली.
प्रवासी वाढले, पण विमान कंपन्यांना घरघर लागली आहे. ५ वर्षांत ७ विमान कंपन्यांना टाळे लागले. सर्वात जुनी जेट एअरवेजही जमिनीवर आली आहे. त्यातील हजारो कर्मचारी उघड्यावर आले आहेत.
- किंगफिशर एअरलाईन्स
- एअर पेगासास
- एअर कोस्टा
- एअर कार्निव्हल
- एअर डेक्कन
- एअर ओडिशा
- झूम एअर
गेल्या पाच वर्षांत भारतातील विमान प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. पण दुर्दैवानं विमान कंपन्यांना काही अच्छे दिन आल्याचे दिसले नाही. कारण गेल्या पाच वर्षांत देशातल्या जवळपास ७ प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्या बंद पडल्या. बंद पडलेल्य़ा विमान कंपन्यांमध्ये किंगफिशर एअरलाईन्स, एअर पेगासास, एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओडिशा आणि झूम एअरचा समावेश आहे. जेट कंपनीची विमानं जमिनीवर आल्यानंतर जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा आणि एक लाख लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय.
कंपनी आर्थिक अडचणीतून पुन्हा बाहेर येईल आणि जेट पुन्हा सुरू होईल असा आशावाद जेटच्या कर्मचाऱ्यांना आहे. गेल्या काही वर्षात विमानानं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. पण विमानकंपन्या काही वाढल्या नाहीत. जेट नंतर या यादीत आणखी काही कंपन्यांची भर पडणार का याची आता चर्चा सुरू झाली.