प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळे विरोधात सुरु असलेला तपास हा सीबीआयकडे (Central Bureau of Investigation) देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. केतकीच्या वकिलांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या मागणीचं पत्र दिलं आहे. (letter hand over to maharashtra governer bhagat singh koshyari demanding cbi inquiry in ketaki chitale matter)
केतकीच्या वकीलांच्या शिष्ठमंडळांन काही वेळेपूर्वी राज्यापालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी केतकी विरोधात सुरू तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली.
तसेच राज्य सरकार केतकी विरुद्ध सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. तसेच राज्यपालांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला, असा दावा केतकीच्या वकिलांनी केला. त्यामुळे आता केतकीच्या वकिलांनी केलेल्या मागणीवर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
केतकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटकेत आहेत. केतकीने शरद पवारांविरोधात वादग्रस्त फेसबूक पोस्ट केली होती. या एफबी पोस्टमध्ये संत तुकाराम महाराजांच्या अंभगाचं विडंबन करुन शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती.
दरम्यान केतकीविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पवई, गोरेगाव, नाशिक, कळवा, सिंधुदुर्ग, पुणे, पिंपरी-चिंचवड, आंबेजोगई, धुळे, अकोला आणि अमरावतीत गुन्हे दाखल आहेत.