'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 5, 2024, 11:40 AM IST
'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...' title=
राऊतांनी पत्रकारांशी बोलताना लगावला टोला

Sanjay Raut On Modi Win From Varanasi: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या मताधिक्याचा उल्लेख करत राऊत यांनी तुमच्यापेक्षा जास्त मताधिक्य अमित शाहांना आणि राहुल गांधींना मिळाल्याचं म्हणत टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्याकडेही आकडे असल्याचा दावा केला आहे. 

तुम्ही देव नाही

पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांना मोदींनी निकालाच्या दिवशी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जनतेचे आभार मानल्याचं सांगत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी,  "तिसऱ्यांदा मोदींची सरकार येत नाहीये. तुम्ही काय लोकांना धन्यवाद देत आहात. लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे. वाराणसीत जिंकता जिंकता तुमची दमछाक झाली. तुमच्यापेक्षा जास्त तर अमित शाहांना मताधिक्य मिळालं आहे गांधीनगरमध्ये. राहुल गांधींना रायबरेलीमध्ये 4-4 लाखांचं मताधिक्य मिळालं आहे. दुसरीकडे तुम्ही काशीचे पुत्र म्हणवणाऱ्यांना दीड लाखांचं मताधिक्य मिळालं आहे. तुम्ही कोणाला धन्यवाद देत आहात? लोकांनी इंडिया आघाडीला जिंकवलं आहे. हा तुमचा नैतिक पराभव आहे. तो तुम्ही मान्य केला पाहिजे. तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की मी माणूस आहे. तुम्ही देव नाही. लोकांनी मलाही पराभूत केलं आहे," अशा शब्दांमध्ये मोदींवर निशाणा साधला. 

मोदी पडलेले पिछाडीवर

वाराणसीमध्ये मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली तेव्हा सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अजय राय यांच्या तुलनेत पिछाडीवर पडले होते. विशेष म्हणजे नंतर मोदींनी आघाडी मिळवली आणि थेट दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. मात्र मोदी सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये साडेसहा हजार मतांनी पिछाडीवर पडल्याची बातमी सर्वच प्रसारमाध्यमांनी काही काल उचलून धरलेली. याच मुद्द्यावरुन राऊतांनी निशाणा साधला.

नक्की पाहा >> 'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

दडपशाहीविरोधात केलेलं मतदान

तसेच इंडिया आघाडीला मिळालेल्या मतांबद्दल बोलताना संजय राऊत यांनी, संविधान वाचवण्यासाठी, ईडी, सीबीआय, इन्मक टॅक्सच्या माध्यमातून चालेल्या दडपशाहीविरोधात जनतेनं मतदान केलं आहे तर आम्ही त्याचं स्वागत करणार, असं म्हटलं आहे. आम्ही लोकशाही मानतो. सरकार बनवण्याची तयारी करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आकडे तर आमच्याकडेही आहेत. आम्हीसुद्धा आता 250 पर्यंत आहोत. आम्हाला 100 जागाही द्यायला तयार नव्हते. आम्हाला मिळालेली मतं ही लोकांनी दिलेला कौल आहे, असंही राऊत म्हणाले. 

नक्की वाचा >> 'मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य..', ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले, '400 पारचा नारा..'

नितीश कुमार तुरुंगात गेले होते

"चंद्राबाबू आणि नितीश कुमारशिवाय ते त्यांचं सरकार बनवू शकतील का? मोदी-शाहांकडे एवढे आकडे आहेत का? नाही ना? त्यामुळेच मी म्हणतोय की त्यांनी पराभव मान्य केला पाहिजे. हुकूमशाहाबरोबर जायचं की लोकशाहीबरोबर हे चंद्राबाबूंनी ठरवावं. नितीश कुमार तर आणीबाणीच्या वेळेस तुरुंगात गेले होते. त्यांनी कायमच हुकूमशाहीविरोधात भूमिका घेतली आहे. असे बरेच छोटे, छोटे गट आहेत. आता ते निर्णय घेतील देशात लोकशाही हवी की हुकूमशाही हवीये," असंही राऊत म्हणाले.