हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल

उर्मिला मातोंडकर हिची राजकीय कारकिर्द सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.

Updated: Apr 7, 2019, 10:58 AM IST
हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल title=

मुंबई : loksabha election 2019 आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिनय क्षेत्राकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिची राजकीय कारकिर्द सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदू धर्म हा जगातील सर्वाधिक हिंसक धर्म झाला असल्याचं वक्तव्य करणं तुला चांगलच महागात पडल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, याच वक्तव्यामुळे भाजपच्या सुरेश नखुआ यांनी उर्मिलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका कार्यक्रमात तिने हे वक्तव्य केलं होतं. 

हिंदू धर्म हिंसक असल्याचं म्हणणाऱ्या उर्मिलाने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचं म्हणत त्यांनी ही तक्रार दाखल केल्याचं वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं. नाखुआ यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एका पत्रकाराचाही उल्लेख असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय दंडसंविधानाच्या कलम 295 A अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. खुद्द नाखुआ यांनीच त्याची प्रत सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. 

उर्मिलाने 'इंडिया टुडे' या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात, 'हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचाराकडे झुकणारा धर्म असल्याचं म्हटलं होतं'. या धर्माचं स्वरुप कित्येक वर्षांपासून असंच असल्याचंच अनेकांकड़ून भासवण्यात आलं होतं, असंही तिने म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचं कारण देत भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. उर्मिला मातोंडकरने राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच हे वक्तव्य केल्याचा आरोप सुरेश नाखुआ यांनी केला आहे. भारतात एक प्रकारे हुकूमशाहीचीच सत्ता होती, असं म्हणत काँग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिलाने देशात कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, असंही लक्षवेधी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता उर्मिलाविरोधात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीवर तिची काय प्रतिक्रिया असणार आहे, किंवा या प्रकरणात पुढील कारवाई काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.