Loksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपचा '400 पार'चा फुगा फुटला. भाजपप्रणित एनडीएला लोकसभा निवडणुकीत 300 जागांच्या आतच गाशा गुंडाळावा लागला आणि तिथं इंडिया आघाडीच्या कामगिरीनं संपूर्ण देशाला भारावून सोडलं. विरोधकांना हा निकाल पचनी पडला नाही हे स्पष्टपणे दिसत असतानाच अखेर निकालाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. (Lok Sabha Election 2024 Results Devendra Fadnavis)
पक्षश्रेष्ठींकडे 'मला सरकारमधून मोकळं करा' अशी मागणी करण्याचं वक्तव्य करत केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले आणि एकच खळबळ माजली. इंडिया आघाडीतील आणि एनडीएतील काही नेत्यांनी दिल्ली गाठलेली असतानाच इथं फडणवीसांच्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका भूकंपाचे संकेत मिळाले. दरम्यान, फडणवीसंनी घेतलेला निर्णय आणि पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची भूमिका योग्यच असल्याचं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.
'फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली ते योग्यच केलं. कारण पराभव तर झालेलाच आहे. या सरकारबद्दल किती नाराजी आहे याचा त्यांना अंदाज लागला नाही, उलट त्यांनी तिथं स्वप्न रंगवली, दिल्लीला सांगितलं की आमचे 45 पार खासदार येतील आणि त्याच्या आधारावर नरेंद्र मोदींनी दिल्लीत 400 पार ची घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांच्या या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले त्यामुळं आता त्यांनी पराभवाची जबाबदारी घेतली हे योग्यच केलं', असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
फडणवीसांना आता पक्ष त्यांना पदमुक्त करणार की नाही हे ठाऊक नाही असं म्हणत त्यांना सरकारनंच पदमुक्त करायला हवं कारण हा सरकारवरच दाखवलेला अविश्वास आहे त्यामुळं हे संपूर्ण सरकारच गेलं पाहिजे, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करा... असं वक्तव्य केल्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. जिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा आपलं मत मांडलं. 'निवडणुकांमध्ये हार-जीत सुरुच असते. या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली असती तर, मुंबईत 2 लाख मतं जास्त मिळाली असती. आम्ही सर्वांनी मिळून काम केलं. राज्यात मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र काम केलं आणि यापुढेही एकत्र काम करायचं आहे. ही सामूहिक जबाबदारी आहे. पण, एका निवडणुकीमउळं काही संपत नाही आणि आम्ही या साऱ्यानं खचणारो नाही आहोत. त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. पण, आम्ही मात्र टीम म्हणून काम करणार आहोत', असं मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.