loksabha Election 2024: महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. यातही शिंदे गट आणि अजित पवार गट वेगळा झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्यामधील जोरदार रंगत पाहायला मिळले. या दोन्ही पक्षांना एकमेकांची बलस्थाने आणि कमकुवत बाजू माहिती असल्याने कोणाविरुद्ध कोणता उमेदवार द्यायचा? हे विचारपूर्वक ठरवले जात आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या रेसमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे. अभिनेता गोविंदा आहुजाला उत्तर पश्चिम मुंबईसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. या अनुशंगाने अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तर पश्चिम मतदार संघातून महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. याआधी त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे या जागेवर निवडुन आले आहेत. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट वेगळे झाल्यानंतर गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचा मार्ग पकडला. आणि मुलगा अमोल किर्तीकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहिला.
गजानन किर्तीकर यांचे वय लक्षात घेता महायुतीकडून त्यांना पुन्हा उत्तर पश्चिम मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. तर त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा यावर एकमत झाले आहे. या अनुशंगाने गोविंदाच्या नावाची चर्चा आहे.
या आधी गोविंदाने 2004 मध्ये उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपच्या राम नाईकांच्या अभेद किल्ल्यांला गोविंदाने भगदाड पाडले होते. त्यामुळे उत्तर मुंबईतून लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा झेंडा रोवला गेला होता. अभिनेता म्हणून गोविंदा प्रसिद्ध आहे. गोविंदा समाजकार्यासाठीदेखील चर्चेत असतो. अमोल किर्तीकर यांच्याविरोधात हा चेहरा चालू शकतो. त्या अनुशंगाने चाचपणीही सुरू असल्याची माहिती मिळते.
या आधीही या जागेसाठी अक्षय कुमार, माधुरी दिक्षित, नाना पाटेकर, यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र अक्षय आणि नाना पाटेकरांनी स्पष्ट शब्दात याला नकार दिला. तर माधुरी दिक्षित यांच्याकडून उत्तरच आले नाही, अशी माहिती समोर येत आहे.