Sanjay Raut Comment: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या विधानावरुन लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी नकली संतान अशी टीका केल्याचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी केलेली ही टीका म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरेंचा अपमान असल्याचं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी बाळासाहेबांच्या नकली संतान असं म्हणत टीका केल्याचा संदर्भ देत पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, "जर ते उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची नकली संतान म्हणत असतील तर ते बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मिनाताई ठाकरे एक देवता समान माता-पिता होते. पूर्ण महाराष्ट्रात पूजा करतो. कदाचित मोदीजी हे विसरले आहेत. मोदीजींच्या मेंदूत काहीतरी गडबड झाली आहे. कोणी बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरेंचा अशाप्रकारे अपमान करत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. कोणाला स्वत:ची खरी संतान असेल तर त्याबद्दल बोलावं," असा टोला लगावला.
संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त करताना औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झालेला असा उल्लेख करत तुम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या बाळासाहेब-माँसाहेबांना नकली म्हणता म्हणून औरंगजेबाची संतान आहात, असंही म्हटलं. "माननीय हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्याबाबतीत हे अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. देवता समान व्यक्तीमत्व होती. या दोन्ही व्यक्तीमत्वांना महाराष्ट्र पुजतो, त्यांना तुम्ही नकली म्हणता? ही तुमची हिंमत? म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात. तुम्ही औरंगजेबचे वंशज आहात," असा टोला राऊत यांनी लगावला. नगरमधील सभेत संजय राऊत यांनी मोदींबद्दल वादग्रस्तविधान केल्याच्या मुद्द्यावरुन नाशिकमध्ये राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवाल
"जर तुम्ही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मिनाताई ठाकरेंना नकली म्हणत असाल तर आम्ही सगळे 11 कोटी लोक (महाराष्ट्राची लोकसंख्या) त्यांचे संतान आहोत. त्यांनी आमच्यावर पुत्राप्रमाणे प्रेम केलं आहे. आम्हाला घडवलंय त्यांना तुम्ही नकली म्हणत असाल तर हा प्रश्न केवळ शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाही या महाराष्ट्रावर ममतेची ताकद घालणाऱ्या बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या अपमानाचा विषय आहे. तेलंगणात जाऊन या औरंगबजेबाच्या संतानांनी अशाप्रकारेची भाषा महाराष्ट्राविरुद्ध करणं हे बरोबर नाही," असं राऊत पत्रकारांसमोर प्रतिक्रिया नोंदवताना म्हणाले.