महाराष्ट्रातून सकाळी ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट हटवली

राज्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

Updated: Nov 23, 2019, 11:59 AM IST
महाराष्ट्रातून सकाळी ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट हटवली
फोटो सौजन्य : एएनआय

मुंबई : महाराष्ट्रात २९ दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर शनिवारी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्मथनातून शिवमहाआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच, शनिवारी संपूर्ण राजकीय खेळी पलटली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हटवण्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर मुंबईत सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निकालांमध्ये भाजपाने १०५ मतांनी बहुमत मिळवलं होतं. तर शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेस ४४ मतांनी निवडून आले होते. 

निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीने एकूण १६१ जागा मिळवल्या होत्या. भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ सुरु असतानाच, कोणताही पक्ष सत्ता स्थापन करु शकला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर सतत चर्चा, बैठकांनंतर अखेर आज भाजप-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यात आलं. राज्यपाल यांनी भाजपा-राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.