Maharashtra Assembly : 106 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते, यात नक्की काहीतरी काळंबेरं आहे, अशी शंका राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात उपस्थि केली. आघाडी सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नावाची चर्चा होती. पण सर्वांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ती जबाबदारी घ्यावी लागली, असा गौप्यस्फोटही अजित पवारा यांनी केला.
एकनाथ शिंदे जांच्याबरोबर गेले आहेत, त्या भाजपने शिवसेनेची मदत घेऊन टप्प्या टप्प्याने पक्ष वाढवत नेला, 80 साली भाजपचे 14 आमदार होते, 90 साली 16 झाले, 95 साली 65 झाले, 2014 भाजपचे 122 आमदार झाले. 2019 ला 105 आमदार निवडून आले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढणव्याचा अधिकार असं सांगत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशारा दिला.
अजित पवार यांनी वाचून दाखवली यादी
आता भाजपबरोबर अनैसर्गिक युती केल्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला, पण सर्वांना माहित आहे, मी काम करत असताना कधीच भेदभाव करत नाही, 288 आमदारांना निधी मिळावा यासाठी आम्ही काम केलं. नगरविकास खात्याला 12 हजार कोटी निधी दिला. आणखी निधी देण्याचं शिंदे यांना सांगितलं होतं. गेल्या अडीच वर्षात शिंदे गटातील आमदारांच्या खात्याला किती निधी दिला याची यादीच वाचून दाखवली. कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनामी करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही अजित पवार यांनी केला.
राज्यपाल अॅक्शन मोडमध्ये
आज अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घेण्याचं काही कारण होतं का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. सदस्यांच्या अपात्रेचा ठराव न्यायप्रविष्ठ असताना ठराव आणण्याची घाई गरज नव्हती. असं काही तज्ज्ञ देखील बोलून दाखवतात. अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम राज्यपालांनी केलं.
आम्ही सरकारमध्ये असताना एकनाथ शिंदे आणि आम्ही अनेकदा राज्यपालांना भेटायला जायचो, सर्व गेल्यानंतर मला आणि शिंदेंना राज्यपाल थांबवायचे, त्यानंतरही 12 आमदारांचा निर्णयही राज्यपालांनी दिला नाही. आता तर राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत.
आमच्या काळात अनेक वेळा सांगूनही अध्यक्षपदाची निवड झाली नाही. आता अध्यक्षपदाची निवड ताबडतोब झाली. मागच्या चार दिवसात सर्व घटना इतका फास्ट पाहिला मिळाल्या, त्यामुळे जनतेच्या मनात शंका उपस्थित होते, विचार करतायत, असं का घडतंय, गेल्या आठ ते दहा दिवसात राज्यात अनेक गोष्टी घडल्या. शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. उद्धव ठाकरेंना पद सोडावं लागलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये काय मेसेज गेला याचाही अंदाज घ्या असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
जेव्हा जेव्हा शिवसेना फोडण्याच प्रयत्न झाला...
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जेव्हा जेव्हा फोडण्याचा प्रयत्न केला गेला, बाहेर पडले, त्यातला एकही आमदार नंतर निवडून आला नाही. छगन भूजबळ, नारायण राणे यांच्याबरोबर जितके आमदार बाहेर पडले, त्याचा आत्मचिंत झालं पाहिजे याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली.
बंडखोर आमदारांना टोला
गेल्या आठ दिवसात आपण बरंच काही पाहिलं, अनेक आमदारांना सूरतमध्ये जायला मिळालं, सूरतवरुन गुवाहाटीला जायला मिळालं, गुवाहाटीवरुन गोव्याला जायला मिळालं, या आमदारांना आजपर्यंतच्या हयातीत इतकं फिरायला मिळालं नसेल,
त्यात आमचे शहाजीबापू काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, एकदम ओक्केमध्ये. शहाजीबापू ही मोठी लोकं कधी एकत्र येतील ते कळणार पण नाही. तुम्ही राहाल पाठीमागे असा सल्ला अजित पवार यांनी शहाजीबापू पाटील यांना दिला.
गोव्यात काही आमदारांनी डान्स केला, काही तर टेबलावरच नाचायला लागले, हे बरोबर नाही, सत्ता येत असते, सत्ता जात असते. यावर दीपक केसरकर यांनी दिलगीर व्यक्त केली, कारण केसरकर यांच्यावर राष्ट्रवादी संस्कार झालेत. अब्दुल सत्तार आमच्याबरोबर गप्पा मारत होते, आणि आम्हाला न सांगता सुरतलाही निघून गेले असा टोलाही अजित पवार यांनी दिला.